V 24 Taas
भारतीय संघ येत्या जून महिन्यात टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ही स्पर्धा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. दरम्यान या स्पर्धेपूर्वी माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, विराट कोहलीला या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळणार नाही.
द टेलिग्राफने एक वृत्त दिलं होतं, ज्यात म्हटलं गेलं होतं की, विराटला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळणं कठीण आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी विराटला भारतीय संघात स्थान देणं का महत्वाचं आहे,याबाबत पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाने मोठं वक्तव्य केलं आहे.पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने म्हटले की, ‘तुम्ही विराटशिवाय संघ बनवू शकत नाही, यात काहीच शंका नाही. विराट वर्ल्डक्लास फलंदाज आहे. त्याने गेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत काय केलं हे आम्ही सर्वांनी पाहिलं. विराटने एकट्याच्या जिवावर ३-४ सामने जिंकून दिले. जेव्हा भारतीय संघ अडचणीत होता त्यावेळी विराटने जर फलंदाजी केली नसती तर भारतीय संघाला ३-४ सामने गमवावे लागले असते. ज्यात साखळी फेरीत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या सामन्याचा देखील समावेश आहे. या सामन्यांमध्ये भारतीय संघाने सुरुवातीलाच विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर विराटने कमबॅक करुन दिलं होतं.’
वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा भारतात पार पडली. या स्पर्धेत विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या होत्या. या खेळीच्या बळावर त्याला मालिकावीर पुरस्कार देखील देण्यात आला. स्पर्धेतील सलग १० सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. कोहलीवर टीका करणाऱ्यांना इरफानने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तो म्हणाला की, ‘कोहलीने संघाला सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे त्याच्या जागेवर प्रश्न उपस्थित करणं चुकीचं आहे. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत विराटच्या स्थानावर प्रश्न उपस्थित करणारे लोक गल्ली क्रिकेटचे स्टार आहेत.
तसेच तो पुढे म्हणाला की,’ टी-२० फॉरमॅटमध्ये स्ट्राईक रेट अतिशय महत्वाचा आहे.जर तुम्ही जास्त चेंडू खेळत असाल तर तुमच्या संघावरील दबाव वाढत जातो. जर तुम्ही १० चेंडू खेळून ३० धावा करत असाल तर पुढील फलंदाजावर दबाव येत नाही. मात्र जर तुम्ही बॉल टू बॉल खेळत असाल तर, संघावरील दबाव वाढत जातो.’ कोहलीच्या टी-२० रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ११७ सामन्यांमध्ये ५० पेक्षाही अधिकच्या सरासरीने २९२२ध धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ३७ अर्धशतक झळकावले आहेत.