V 24 Taas
मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडाल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. नेवासा तालुक्यातील वाकडीमध्ये ही घटना घडली आहे. बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडालेल्या सहाही जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी गावामध्ये ही घटना घडली आहे. बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या मांजराला वाचवण्यासाठी एक जण खड्ड्यामध्ये उतरला. पण मांजराला वाचवण्याच्या प्रयत्नात तो खड्ड्यात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर ५ जण देखील या खड्ड्यामध्ये बुडाले. बायोगॅसचा खड्डा शेणाने भरलेला होता. त्यामुळे एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वजण खड्ड्यामध्ये बुडाले. सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये पडले.
या घटनेची माहिती मिळताच अहमदनगर पोलिसांनी आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने या सहाही जणांना बायोगॅसच्या खड्ड्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडालेल्या व्यक्तींची नावं देखील समोर आली आहेत. माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे, बाबासाहेब गायकवाड यांच्यासह आणखी दोघे जण बुडाले.