V 24 Taas
एकीकडे महाविकास आघाडी आणि वंचितच्या युतीचा तिढा अद्दाप सुटलेला नाही. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांना वंचितचा पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली आहे.
काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर?
“आम्ही आदर्श भूमिका घेत असतो. त्यामुळे शाहू महाराजांचे विचार आणि त्यांचे कुटुंब हे चळवळीचे जवळचे कुटुंब आम्ही मानतो. म्हणून पक्षाच्या वतीने त्यांना आमचा पुर्णपणे पाठिंबा आहे. छत्रपती शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी जे प्रयत्न करायला लागतील. ते पक्षाच्या वतीने आम्ही करु. तसेच मागे ते घडलं ते पुन्हा घडू नये याची दक्षता घेऊ,” असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
“ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवा पक्ष काढला आहे. त्यांनी त्यांची यादी आमच्याकडे सादर केली. त्यांना एवढंच सांगितलंय की आमचं घोंगडं तिकडं भिजतं ठेवलंय. त्यामुळे ते मिटल्याशिवाय आम्ही निर्णय घेऊ शकत नाही, असे म्हणत महाविकास आघाडीच्या युतीबाबतची चर्चा त्यांनाच विचारा,” असेही ते प्रकाश आंबेडकर म्हणाले.
शाहू महाराजांनी मानले आभार..
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी आभार मानले आहेत. “वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर केल्याचे मला आत्ताच कळालं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांचे संबंध हे किती जिव्हाळ्याचे होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. हा दृष्टिकोन ठेवूनच त्यांनी मला हा पाठिंबा दिला असेल असं मला वाटतं,” असे शाहू महाराज म्हणाले.