V 24 Taas
जालना :- झाडूने महिलाच्या शरीराला स्पर्श करुन उपचार करणारा बाबा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. महिलेच्या तक्रारीवरून भोंदू बाबाविरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकरदन तालुक्यातील चांदेकर येथील सोमीनाथ महाराज ढाकणे उर्फ गुणवंत बाबा यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन एक महिला आली होती. या महिलेने आपल्या समस्या सांगितल्यानंतर बाबांनी या महिलेच्या शरीराला झाडूने स्पर्श करत तुमच्यावर बाहेरची हवा आहे, असं सांगितलं.
त्यानंतर या महिलेच्या संपूर्ण शरीराला झाडूने स्पर्श केला होता. या महिलेला हा स्पर्श मान्य नसल्याने महिलेने बाबाला असं का करता म्हणत या स्पर्शबाबत बाबाला जाब विचारला. बाबा नी रक्षा मिश्रित पाणी महिलेच्या अंगावर शिंपडून तुम्हाला या बाहेरच्या हवेपासून सुटका मिळण्यासाठी सात वेळा येथे फिरण्यास सांगितले.
त्यानंतर या बाहेरच्या हवेपासून तुमची सुटका होईल असं म्हणताच महिलेने पुन्हा या बाबाच्या अघोरी पद्धतीला विरोध करत बाबाला जाब विचारला होता. बाबाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या महिलेने हसनाबाद पोलीस स्टेशन गाठले. तसेच बाबा विरुद्ध तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सखोल चौकशी केली असता सदर बाबा हा महिलांच्या अंगाला झाडूने स्पर्श करून उपचार करत असल्याचं सत्य समोर आलं. त्यानंतर जालन्यातील हसनाबाद पोलिसांनी तात्काळ अघोरी उपचार करणाऱ्या बाबाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध हसनाबाद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला.याप्रकरणी अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे.