V 24 Taas
संग्रामपूर:- मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सामाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्यात जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना एका वाघाचे दर्शन झाले आहे. मात्र शुक्रवारी संध्याकाळी पट्टेदार वाघोबा अभयारण्यातील पाणवठ्याच्या पाण्यात आनंदाने डूंबताना दिसून आला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे. अशात नागरिक त्रस्त असून प्राण्यांचीही अवस्था बिकट आहे. यामुळे अनेक वन्यप्राण्यांनी आता अभयारण्यातील पाणवठे गाठल्याचे स्पष्ट होत आहे.
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत आदिवासी बहुल अतिदुर्गम भाग असलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील अंबाबरवा अभयारण्यात शुक्रवारी दूपारी ३ वाजता पासून सूरू झालेल्या जंगल सफारी दरम्यान जळगाव जा. शहरातील तीन पर्यटकांना पट्टेदार वाघाने दर्शन दिले. जंगलातील एका पानवट्यात वाघ दिसून आल्याने पर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
अंबाबरवा अभयारण्यात निसर्गरम्य वातावरणात वाघ पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत आहेत. गेल्या वर्षीच्या प्राणी गणनेनुसार या प्रकल्पात वाघ ३, बिबट ३, अस्वल १२, नील गाय ५४, सांबर ३७, भेडकी १५, गवा ६४, रान डुक्कर ४८, लंगूर ५१, माकड ११६, रान कोंबडी २०, रान मांजर ३, मोर ८५, ससा ५, सायाळ १ असे एकूण ५१७ वन्य प्राण्यांची नोंद आहे.
रखरखत्या उन्हात पाणवठ्यात गारेगार आनंद लुटतांना पट्टेदार वाघोबा
सद्यस्थितीत उष्णतेचा कहर सुरू आहे. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांना बाहेर पडणंही कठीण झालं आहे. उन्हाचा पारा प्रचंड चढल्याने सर्वांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. वाघाला तर उष्णता सहन होत नाही. त्यामुळे रखरखत्या उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून वाघोबा शुक्रवारी एका पाणवठ्यात गारेगार आनंद लुटतांना दिसून आला. त्यावेळीच पर्यटकांना त्याचे दर्शन झाले आहे. जंगल सफारी दरम्यान पर्यटकांसोबत मार्गदर्शक शरीफ केदार उपस्थित होते.
जंगल सफारी दरम्यान जळगाव जा. येथील पर्यटकांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे. शुक्रवारी दुपारच्या जंगल सफारी दरम्यान अभयारण्यातील एका पानवट्यात वाघ दिसून आला आहे.
सुनील वाकोडे
वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव)
सोनाळा ता. संग्रामपूर