V 24 Taas
एकीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीसोबत युतीसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. अशातच आता काँग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांचा भाजपच्या पोस्टरवर फोटो लावत वंचित आघाडीने जोरदार टीका केली आहे. तसेच भाजप प्रवेशाचा मुहूर्त कधी? असा खोचक सवालही उपस्थित केला आहे.
नेमकं काय घडलं?
“मागच्या निवडणुकीत काँग्रेसला कमी मतदान झालं होत. जो पक्ष काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न करतो तो भाजपला मदत करतो त्यामुळे कोणीही निवडून येत नाही.ज्यामुळे जो विरोधात आहे तो निवडून येतो.म्हणून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका, असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली होती. यावर आता वंचित आघाडीकडूनही प्रणिती शिंदेवर पलटवार करण्यात आला आहे.
“तुम्ही ठीक आहात? आम्हाला समजले आहे की, इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासोबत जमत नाही. नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे? असा सवाल वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या एक्स हॅण्डलवरून आमदार प्रणिती शिंदे यांना केला आहे.तसेच आम्ही महाराष्ट्रातील वंचित – बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो. असो, या सर्व गोष्टी बंद करा, असा सल्लाही वंचित बहुजन आघाडीने या ट्विटमधून दिला आहे. दरम्यान, या ट्वीटवर आता आमदार प्रणिती शिंदे काय उत्तर देणार? याकडे लक्ष लागले आहे.