V 24 Taas
अकोल्यात एका वहीनीने दिराच्या प्रेमात वेडी होऊन क्रूरतेचा कळस गाठला आहे. ही महिला तिच्या पतीसोबत भयानक कृत्य करून बसली. पतीचा चुलत भाऊ सातत्याने घरी यायचा. यातच दोघांची नजरभेट झाली अन् हळूहळू संवाद वाढला. यातून त्यांच्यात जवळीकता निर्माण झाली. दोघांची मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.
त्यानंतर पती त्यांच्या प्रेमात अडसर ठरू लागला. त्यामुळे पत्नीने प्रियकराच्या ( दिराच्या ) मदतीने पतीला संपवलं. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर तिने पतीचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव देखील रचला. मात्र 2 दिवसांत त्यांचं हे बिंग शवविच्छेदनातून फुटलं. पत्नी आणि तिच्या प्रियकर दिराला पोलिसांनी गजाआड केलं. ही घटना अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील तामशी गावामध्ये घडली आहे.
काय आहे संपूर्ण घटना?
अकोला जिल्ह्यातील तुलुंगा गावातील मेसरे नावाचं एक जोडपं बाळापुर तालुक्यातील तामशी गावातील वीट भट्टीवर कामासाठी गेलं होतं. प्रमोद मेसरे आणि मंगला मेसरे, असं या पती पत्नीचे नाव आहे. काम करत असताना रविवारी अचानकपणे प्रमोदचा मृत्यू झाला. या संदर्भात त्याच्या पत्नीने बाळापुर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
रात्री गाढ झोपीत असताना प्रमोदला हृदयविकाराचा झटका आला. त्यातूनच त्याचा मृत्यू झाला, असं मंगलाने पोलिसांना सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मित मृत्यूची नोंद केली. त्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास एपीआय पंकज कांबळे यांनी सखोलपणे केला. सुरुवातीला पत्नीने सांगितलं की, तिच्या पतीला दारूचे व्यसन होते. त्यामुळे हा आकस्मित मृत्यू झाला असावा, असं तिने पोलिसांना भासवून दिले होते.
वैद्यकीय अहवालाने बिंग फुटले
दरम्यान दोन दिवसानंतर प्रमोदचा वैद्यकीय अहवाल समोर आला. यात त्याचा गळा आवळून खून झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता मृत प्रमोदची पत्नी म्हणजेच मंगला हिच पतीचा चुलत भाऊ ‘गोटू मेसरे’ याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. या प्रकरणात बाळापुर पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली. त्यांनी मंगला आणि गोटू या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांनी दोरीनं गळा आवळून प्रमोदची हत्या केल्याची कबूली दिली.
मिळालेल्या माहितीनुसार मंगला आणि गोटू यांचे प्रेमसंबंध होते. गोटू हा अविवाहित आहे. त्यांच्या दोघांच्या प्रेमाची कुणकुण तिच्या पतीला म्हणजेच प्रमोदला लागली होती. प्रमोदने दोघांचं भेटणं बंद केलं होतं. त्यामुळे प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्याचा मंगलाने निश्चय केला. अखेर तिने दिराच्या मदतीने पतीला संपवलं.