V 24 Taas
संग्रामपूर:- कुपोषणावर मात करण्यासाठी ६ महिने ते ३ वर्षों वयोगटातील बालकांना वाटप करण्यात येत असलेला पाकीटबंद पूरक पोषण आहार अत्यंत निकुष्ठ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या निकृष्ट पाकीट बंद पूरक पोषण आहारामूळे गरोदर स्तनदा मातांसह बालकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यात पूरक पोषण आहार योजनेचा फज्जा उडाला आहे. प्रशासकीय यंत्रणेने या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शासनाचा कोट्यवधीचा खर्च वाया जात आहे. महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयामार्फत तालुक्यातील गरोदर माता व ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालकांसाठी पाकीटबंद पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात येत आहे.
मात्र या पाकीटबंद धान्यांचा पूरवठा अत्यंत निकृष्ट असल्याने शिजवल्यावर त्याचा रंग काळा पडत असून त्यातून दुर्गंधी येत असल्याने गरोदर मातांसह बालकांच्या जीवाशी खेळण्याचा जीवघेणा प्रकार संग्रामपूर तालुक्यात आढळून आला आहे. संग्रामपूर तालूक्यात गरोदर स्तनदा मातांची संख्या १ हजार ८२३ असून ६ महिने ते ३ वर्षों वयोगटातील ५ हजार १६७ बालके आहेत. १७९ अंगणवाड्यांच्या माध्यमातून पाकीट बंद धान्याचा वाटप ५ हजार ३४१ लाभार्थ्यांना करण्यात आला आहे.
यामध्ये मल्टी मिक्स सिरीयल्स अँड प्रोटीन प्रीमिक्स, एनर्जी डेन्स मूंग डाळ खिचडी प्रीमिक्स पाकीट बंद पूरक पोषण आहाराचा समावेश आहे. सदर आहार चांगल्या प्रकारे मिसळून उकडलेल्या पाण्यात घातल्यावर साधारणतः २० ते २५ मिनिटे शिजवण्याची पद्धत आहे. मात्र पाकीट बंद धान्य निकृष्ट असल्याने शिजवल्यावर त्याचा रंग काळा पडत असून त्यातून दुर्गंधी येत असल्याने सदर आहार खाण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या गंभीर प्रकाराकडे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी कायम दुर्लक्ष केल्याने गरीब कुटुंबातील गरोदर माता व बालकांना निकुष्ठ स्वरूपाच्या पाकीट बंद धान्याचा पुरवठा करून त्यांच्या आरोग्याशी खेळल्या जात आहे. निकृष्ट दर्जाचा पूरक आहार खाद्यान्न म्हणून दिला जात असल्यानेच बालकांमधील कूपोषण वाढत असल्याचा गंभीर आरोप गरोदर मातांकडून होत आहे. या गंभीर प्रकाराबाबत संग्रामपूर येथील प्रभारी प्रकल्प अधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
कोट
ग्रामीण भागात अंगणवाड्यांना पूरवठा दाराकडून पाकीट बंद पूरक पोषण आहाराचे निकृष्ट धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. पाकीट बंद खाद्यान्न शिजवल्यावर त्याचा रंग काळा पडत असून त्यातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने तो आहार जनावरांच्या खाण्यायोग्य नाही. आहाराद्वारे गरोदर स्तनदा मातांसह बालकांच्या जिवाशी खेळणे तातडीने थांबविण्यात यावे. तसेच निकृष्ट धान्याचा पुरवठा करणाऱ्यासह इतर झारीतील शुक्राचार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल.
पंकज मिसाळ तालूका उपाध्यक्ष सरपंच संघटना संग्रामपूर