V 24 Taas
महाविकास आघाडीसोबत लोकसभा निववडणुकीसंदर्भात बोलणी सुरू असताना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. आजच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतंत्र निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर लगेचच ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. हिंगोलीतून डॉ. बी. डी. पाटील, लातूरमधून नरसिंहराव उदगीरकर, सोलापूर राहुल गायकवाड, माढा रमेश बारसकर, सातारा मारुती जानकर, धुळे अब्दुल रहेमान, हातकणंगले दादासाहेब चवगोंडा पाटील, रावेर संजय ब्राम्हणे, जालना प्रभाकर बकले, मुंबई उत्तर मध्य अबुल हसन खान तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून काका जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडी कडून सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर.सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून राहुल गायकवाड यांना, तर माढा लोकसभा मतदारसंघातून रमेश बारसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर केल्याने प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रमेश बारसकर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता, मात्र आता वंचित कडून रमेश बारसकर हे माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहेत. रमेश बारस्कर मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष आणि ओबीसी नेते म्हणून परिचीत आहेत. सोलापूर जिल्ह्यात अनेकांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतरही रमेश बारसकर शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससलाही हा मोठा धक्का मानला जात आहे.
नाना पटोले यांचे भाजपशी छुपे संबंध-प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी आजच पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि वंचितमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेसला ७ जागांवर पाठिंबा देण्याचं पत्र पाठवण्यात आलं होतं, मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याला केवळ दोन जांगावर पाठिंबा हवा आहे. काँग्रेसचा उमेदवार जिंकणार असल्याने नाना पटोलेंना प्रचंड दुःख झालं आहे, यातून भाजपच्या काही नेत्यांसोबत त्यांचे संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
आधी मविआतील वाद मिटवा-प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज नागूपर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘अनेक ठिकाणी महाविकास आघाडीत समझोता नाही हे आम्ही सांगतो होतो. ते आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे यादी जाहीर होत नाही. या तिन्ही पक्षांच्या वेगळवेगळ्या याद्या बाहेर पडताना दिसत आहेत. ते मैत्रीपूर्ण अशा पद्धतीची संकल्पना मांडत आहेत. आम्हाला हे अगोदर माहीत होतं. यामुळे आम्ही त्यांना पहिलं तुम्हीच वाद मिटवा म्हटलं’.