V 24 Taas
‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. पोलीस हे नागरिकांच्या रक्षणासाठी असतात, त्यांचं संरक्षण करणं हे त्यांच प्रथम कर्तव्य असतं. हाच विश्वास दर्शवत सर्वसामान्य नागरिक प्रथम न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे धाव घेत असतात. मात्र, अकोला शहर पोलिसांना नेमकं झालंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित करण्यामागे कारण ठरतय ते सतत घडणारे धक्कादायक प्रकार. काही दिवसांपूर्वीच शहरातील एका बड्या डॉक्टरविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला अकोला पोलिसांनी तब्बल चार दिवस तक्रार न घेता रात्री उशिरापर्यंत ताटकळत ठेवलंय. असा आरोप एका महिलेने केला होता. हे प्रकरण ताजे असताना अकोला शहरातील एका पोलीस हवालदाराने तक्रार करण्यास आलेल्या एका महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.
तक्रारदार महिलेकडे चक्क शरीरसुखाची मागणी
अकोला जिल्ह्यातल्या चान्नी पोलीस स्टेशनचे हवालदार बाळकृष्ण येवले (ब.नं.1636) यांनी एका गावातील महिलेला शरीर सुखाची मागणी करून तिचा विनयभंग केला आहे, अशी तक्रार संबंधित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलीय. या घटनेनंतर कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद मागावी तरी कुणाकडे, असा प्रश्न सर्वसामान्यकडून उपस्थित केला जातोय. इतकेच नव्हे तर हवालदार येवले यांनी महिलेच्या मोबाईलवर सतत फोन करुन त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोपही या महिलेकडून करण्यात आलाय. पोलीस हवालदार येवले आणि महिलेच्या संभाषणाच्या अनेक ऑडिओ क्लिप देखील ‘माझा’ च्या हाती लागल्या आहेत. त्यामुळे या तक्रारीची दखल घेऊन पोलीस नेमकं काय कारवाई करतात, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
ऑडिओ क्लिप’मधील संभाषण नेमकं काय?
तक्रार दार महिला- हॅलो
पोलिस हवालदार – पोचली का?
महिला – हो पोचली.
पोलिस – अरे.. ते वाट पाहत आहे तुझी, नंबर लाव.
महिला- हा.. लावला सर, प्रोसिजर सुरू आहे.
पोलिस – चालू आहे ना.
महिला – चालू आहे.
पोलिस – मी तर 2 ते 3 फोन लावले तुला.
महिला – फोन सायलेंटवर होता.
पोलिस – काय हेंबा… आहे तू.
महिला – सायलेंट होता.
पोलिस – तू भीत कोणाला, चोर आहेस का? तू.
महिला – चोर नाही, फोन सायलेंट करून ठेव.
पोलिस – तू भीत असणार तर मला सांग, मी तर नाही भीत.
महिला- नाही … भीत नाही सर. भ्यायचं कशाला.
पोलिस – तू माझे शब्द लक्षात ठेव, भीत का?
महिला – नाही भीत नाही.
पोलिस – ठीक आहे ते आटोपूनं ये, उद्या मी तुझ्या घरी येतो.
महिला – बर..
पोलिस – जेवण काय बनवते.
महिला – तुम्ही सांगा ते करतो.
पोलिस – मटन, दारु, मच्छी, अंडे हे काहीच चालत नाहीये.
महिला – साध जेवण.
पोलिस- नाही.. उडीद दाळ आणि भाकर.
महिला- ओके.
पोलिस – उद्या येतो मी..
महिला – हो