V 24 Taas
लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. अशातच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निलेश लंके यांच्या उमेदवारीवरुन महत्वाचे विधान केले असून लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे संकेत दिले आहेत.
काय म्हणालेत बाळासाहेब थोरात?
“दक्षिण नगरची निवडणूक ही पाहण्याजोगी होईल. निलेश लंके उमेदवारीसाठी तयार आहेत. त्यांची एन्ट्री जोरदार करायची आहे. असे म्हणत निलेश लंके उभे राहतील आणि विजयी होतील,” असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे दक्षिण नगरमधून निलेश लंकेविरुद्ध सुजय विखे असा सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आम्ही एकजुटीने काम करु..
तसेच “जागा वाटपावरुन फक्त महाविकास आघाडीत नाही तर महायुतीतही तिढा सुरू आहे. आमच्याकडे फक्त तिढा, तिकडे मात्र अनेक तिढे आहेत. आमचे सर्व तिढे सुटतील आणि आम्ही एकजुटीने काम करू, असेही बाळासाहेब थोरात म्हणालेत.
मनसे- भाजप युतीवरुन ठाकरेंना टोला..
तसेच “राज ठाकरेंच्या भाषणाचे आणि लाव रे तो व्हिडिओचे सर्वांनाच कौतुक होते. मात्र ते राज ठाकरे आता दिसत नाहीत. ते महायुतीत गेले तर जनतेत त्यांचा प्रभाव ओसरलेला दिसेल,” असे म्हणत मनसे- भाजप युतीबाबतही बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.