V24V 24 Taas
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथील भाजप कार्यालयात त्यांनी कमळ हाती घेतलंय. मागील काही दिवसांपासून नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवणार, अशा चर्चा रंगल्या होत्या.या चर्चांना पूर्णविराम मिळाला. भाजपने अमरावतील लोकसभेतून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर राणा यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. दुसरीकडे नवनीत राणा यांच्या प्रवेशानंतर बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
नवनीत राणा यांना अमरावतीतून उमेदवारी दिल्यास आम्ही महायुतीतून बाहेर पडू, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. राणा दाम्पत्याला पैशांचा माज आहे, अशी घणाघाती टीकाही बच्चू कडू यांनी केली होती.दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांना आपली पहिली प्रतिक्रिया दिली. “मागील ५ वर्ष आम्ही एनडीएचा घटक म्हणून काम करत असून पंतप्रधान मोदी विचारधारेशी जुळून काम केलं आहे. गेल्या १२ वर्षात स्वाभिमान पक्षाने एक आमदार आणि खासदार घडवला आहे. पण आता आम्ही भाजपसोबत मिळून काम करणार आहोत”, असं नवनीत राणा यांनी म्हटलं. मी भाजपची सामान्या कार्यकर्ता म्हणून काम करणार असून मला जो आदेश मिळेल तिथं जाऊन मी पक्षासाठी काम करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ४०० पारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करू, यातील एक जागा नागपुरातील राहील”, असा विश्वासही नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी मोदींच्या गॅरंटीवर विश्वास ठेऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश केल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. नवनीत राणा यांच्या पक्षप्रवेश भाजपला मजबुती देणारा असेल. त्या अमरावती पुरत्या नेत्या राहणार नसून विदर्भ आणि महाराष्ट्राला देखील त्यांचा फायदा होईल, असंही बावनकुळे म्हणाले.