V 24 Taas
हिंगोली : राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. यात वारा जोरदार वाहत असल्याने घरांचे तसेच शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान हिंगोली जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
हवामान विभागाने राज्यात वाकली पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार अमरावती, अकोला, बीड या जिल्ह्यांसह हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. दरम्यान हिंगोलीच्या नरसी परिसरातील दहा पेक्षा अधिक गावात वादळी वाऱ्याने शेतीसह घरांचे मोठे नुकसान केले आहे. शेतात असलेले मका, ज्वारी हि पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शेतकरी जखमी
हिंगोलीच्या कडती गावामध्ये घरावरील लोखंडी पत्राने शेतकऱ्याचा डोक्याला गंभीर इजा झाली आहे. तर जनावरांना देखील दुखापत झाली आहे. या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांनी योजनेतून घेतलेले सोलार पंप, विद्युत पोल, रोहित्र अक्षरशः जमिनीतून उखडून पडल्याने वादळी वाऱ्याचा वेग किती होता याचा अंदाज येऊ शकतो. दरम्यान हिंगोली जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त गावात पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.