V 24 Taas
कर्नाटकमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. हुबळी-धारवाड नगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवकाच्या २१ वर्षीय मुलीची तिच्यात वर्गातील मुलानं चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ती शिकत असलेल्या कॉलेजच्या परिसरातच गुरूवारी ही थरकाप उडवणारी घटना घडली.
नेहा हिरेमठ असे हत्या झालेल्या २१ वर्षीय तरुणीचे नाव आहे. हुबळी-धारवाड पालिकेचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची ती मुलगी होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर फय्याज असं आरोपी तरूणाचं नाव आहे. बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती येथे तो राहतो. कॉलेजच्या परिसरात त्यानं नेहावर चाकूने वार केले. ही घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. तिच्यावर क्रूरपणे वार केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाला.
फय्याजच्या कृत्यामागील नेमकं कार अद्यापकळू शकलेलं नाही, असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं.
केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीत एमसीएच्या पहिल्या वर्गात नेहा शिकत होती. याच कॉलेजच्या परिसरात तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह केम्पेगौडा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. या घटनेप्रकरणी गुन्हा नोंदवला असून, तपास सुरू केला आहे, असी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली.
कोण आहे आरोपी फय्याज?
पोलिसांच्या माहितीनुसार, नेहाचा मारेकरी फय्याज हा एका सरकारी शाळेतील शिक्षकाचा मुलगा आहे. सहा महिन्यांपूर्वी परीक्षेत नापास झाला म्हणून त्यानं कॉलेजला जाणं बंद केलं होतं. तो गुरुवारी कॉलेजला गेला होता. त्याच्याकडे चाकू होता. त्याच चाकूने त्याने नेहावर क्रूरपणे वार केले. घटनेनंतर काही स्थानिकांच्या मदतीने त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.