नाशिक लोकसभेवरुन शिंदे गट- भाजपमध्ये कलह! भाजप कार्यकर्ते मुंबईकडे रवाना…

Share

V 24 Taas

नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. नाशिकची जागा मिळवण्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी शेकडो गाड्यांचा ताफा घेत मुंबईमध्ये दाखल झाले होते. हेमंत गोडसे यांच्या या शक्तीप्रदर्शनानंतर भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले असून नाशिकचे भाजप आमदार आणि पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

शिंदे गटाचा दावा…

नाशिकचा मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचा मतदार संघ आहे. त्यामुळे नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटालाचं मिळेल, असे म्हणत खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक लोकसभा शिंदे गटाला देण्याचा दावा केला आहे. तसेच नाशिकच्या जागेवर मित्र पक्ष दावा करत असल्यानं आमच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचण्यासाठी काल मुख्यमंत्र्यांना भेटलो, छगन भुजबळ यांनी जरी नाशिकच्या जागा मागितली असली तरी जागा शिवसेनेलाच मिळेल, असे म्हणत त्यांनी नाशिकच्या जागेवरुन दावा सोडण्यास नकार दिला आहे.

भाजपचीही आक्रमक भूमिका..

अशातच आता हेमंत गोडसे यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकमध्ये भाजपची ताकत जास्त असल्यानं नाशिकची जागा भाजपला मिळाली पाहिजे, असा दावा करत नाशिकचे भाजप आमदार आणि पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. शहरातील सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकारी नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत, त्यामुळे नाशिकच्या जागेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले आहे.

दिनकर पाटील यांचा गोडसेंना इशारा!

तसेच “५० गाड्या घेवून जाणं म्हणजे शक्तिप्रदर्शन नाही, शक्तिप्रदर्शन करायची वेळ आल्यास ५ हजार गाड्या घेवून मुंबईला शक्तिप्रदर्शन करू, असे म्हणत नाशिकची जागा भाजपलाचं मिळेल. हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाल्यास भाजपचे कार्यकर्ते त्यांना मदत करणार नाहीत,” असा इशाराही भाजप नेते दिनकर पाटील यांनी दिला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *