V 24 Taas
जन्मदात्या बापानेच स्वतःच्या पोटच्या मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीलाहा खून कुणी केला, हे समोर आलं नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
मात्र, काही तासांतच संशयाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे. हा खून करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शिवाजी प्रल्हाद रायपूरे (वय ३३, रा. आसलगाव) असं मृतकाचे नाव आहे. प्रल्हाद रायपूरे (वय ६५) असं हत्या करणाऱ्या पित्याचं नाव आहे.
वडिलांनी केला मुलाचा खून
शिवाजी रायपुरे नावाच्या तरूणाने राहत्या घरात स्वतःच्या मानेवर वार केले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती जळगाव जामोद पोलिसांना सकाळी मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी परिस्थिती बघितल्यानंतर त्यांना या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याचा संशय आला.
त्यांनी मृतक शिवाजीच्या मानेवर असलेल्या जखमा पाहिल्या. त्यानंतर त्यांना हा खून असल्याची खात्री झाली. नेमका आरोपी कोण हे माहीत नसल्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. श्वानपथक आणि फिंगरप्रिंट यांना घटनास्थळी बोलावण्यात आलं. मृतक शिवाजीच्या आई वडीलांची विचारपूस करण्यात आली. चौकशीत त्यांना रात्री मृतक शिवाजी आणि त्याच्या वडीलांमध्ये वाद झाल्याचं समजलं. शिवाजीच्या वडिलांना दारूचं व्यसन असल्याचं समजलं. ते नेहमी दारूच्या दुकानात जातात, दारू पितात त्यामुळे आपला अपमान होतो, असं शिवाजीला वाटत होतं.
दारूच्या नशेत केली हत्या
त्यामुळे त्याचा वडिलांसोबत नेहमी वाद होत होता. त्याने वडिलांना दारू प्यायची असेल, तर घरात राहू नका असं सांगितलं होतं. या वादातूनच त्याचे वडील रात्रीच कपड्याची पिशवी घेऊन दारूच्या नशेत घरातून निघून गेले होते. रात्री जेवणानंतर शिवाजीची आई बाजूच्या खोलीत नातवंडांसह झोपली होती. तर शिवाजी त्याच्या खोलीत झोपला होता.
सकाळी उठल्यानंतर शिवाजीची आई झाडून घेण्यासाठी त्याच्या खोलीत गेली. तेव्हा तिला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. हे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमिन सरकली. तिने तातडीने पोलिसांना फोन केला. दरम्यान पोलिसांनी संशयावरून शिवाजीच्या वडिलांना ताब्यात घेतलंय. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी स्वतः खून केल्याची कबुली दिली आहे.