V 24 Taas
संग्रामपूर:- एका बाजूला उकाड्याच्या आगडोंबामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असतांना संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गावात भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना रखरखत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे. तर दुसरीकडे जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पशूपालक त्रस्त झाले आहेत.
याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना तिव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सातपुडा पर्वत रांगेतील आदिवासी ग्राम वसाली येथे गेल्या काही दिवसांपासून कुपनलिकेतील मोटर पंपात बिधाड झाला. नादुरुस्त झालेल्या पंपांची तातडीने दुरुस्ती करण्यात आली नसल्याने येथे पाण्याची समस्या उद्भवली. परीणामी येथील आदिवासी बांधवांची घोटभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात वणवण भटकंती सुरू आहे.
पाण्यासाठी महिलांचे प्रचंड हाल होत असून येथील पाणी प्रश्न गंभीर होत आहे. मात्र याकडे ग्रामपंचायत गांभिर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या भीषण झळा सोसाव्या लागत आहेत. अगोदरच उकाड्याने हैराण केले असून उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वर सरकत आहे. सूर्य आग ओकत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे. त्यातच तिव्र पाणीटंचाईचा तडाखा बसल्याने करावे तरी काय? जगावे तरी कसे?
असे अनेक प्रश्न वसाली येथील आदिवासी बांधवांना सतावत आहेत. ग्रामपंचायतीच्या नियोजन शुन्य कारभारामुळे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप होत असून ग्रामस्थांकडून तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दहा पैकी केवळ एकच हातपंप सूरू
वसाली येथे १० हात पंप बसविण्यात आले आहेत. यापैकी ९ हातपंप बंद असून केवळ एकच हातपंप सूरू असल्याने येथील ग्रामस्थांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने एकच हातपंप सूरू असल्याची माहिती ग्रामसेवकाने दिली आहे.
कुपनलिकेतील नादुरुस्त मोटर पंप बाहेर काढून दुरूस्ती करण्यात आले. दुरुस्त पंपाला पुन्हा कुपनलिकेत सोडण्यात आले असून गावातील पाणी पुरवठा नेहमी प्रमाणे सुरळीत करण्यात आला आहे.
बि. पी. धोंडगे ग्रामसेवक वसाली ता. संग्रामपूर