फळबाग योजनेअंतर्गत ३३.२० लाखांचे अनुदान रखडले गत दोन वर्षांपासून २४७ शेतकरी अनूदानाच्या प्रतिक्षेत…

Share

V 24 Taas

संग्रामपूर:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्याकरिता संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळावे. यासाठी शासनाने हि योजना अस्तित्वात आणली. शासनाचा उद्देश चांगला असला तरी जिल्हा प्रशासनाने शासनाच्या या उद्देशाला हरताळ फासल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

सन २०२२-२३, २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी फळबाग लागवड योजनेअंतर्गत २४७ पात्र लाभार्थ्यांचे तब्बल ३३.२० लाख रुपयांचे अनुदान रखडले आहे. पात्र लाभार्थ्यांना तातडीने योजनेचा लाभ मिळावा यासाठी संग्रामपूर तालुका कृषी कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला.

पाठपुरावा करून सुध्दा शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराचा फटका पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना बसल्याने संग्रामपूर तालुक्यात फळबाग योजनेचा बोजवारा उडाला आहे. संग्रामपूर तालुक्यात फळ पिकांसाठी अनुकूल वातावरण असून कापूस व सोयाबीन पिकाला सक्षम व कायमस्वरूपी पर्याय म्हणून सिंचनक्षेत्र उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांची फळबाग लागवडीकरिता मागणी आहे.

खरीप व रब्बी पिकावर शेतकरी अवलंबून राहिला तर त्याची आर्थिक परिस्थिती सुधारू शकत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा कल फळबाग लागवडीकडे वळविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र येथील शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी वर्षानुवर्ष प्रतीक्षा करावी लागत आहे. हि सर्वात मोठी शोकांतिका आहे.

फळबाग लागवडीत संग्रामपूर जिल्ह्यातून प्रथम 

सन २०२३-२४ या वर्षात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत संग्रामपुर तालुक्यात ४५७.५० हेक्टर क्षेत्रावर फळ पिकांची लागवड पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यातून सर्वाधिक फळ पिकांची लागवड करणारा संग्रामपूर हा एकमेव तालूका ठरला आहे.

फळबाग लागवडीत संग्रामपुर तालुक्याने बूलढाणा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविल्याने तालूका कृषी कार्यालयातील अधिकाय्रांना १ मे महाराष्ट्र दिनी जिल्हा प्रशासनाकडून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. मात्र पात्र लाभार्थ्यांचा विसर पडल्याने गत दोन वर्षांपासून येथील शेतकऱ्यांना अनुदानाच्या प्रतीक्षा करावी लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *