V 24 Taas
क्रिकेट फॅन्सची प्रतिक्षा अखेर संपली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. नुकताच बीसीसीआयने मुख्य संघातील १५ आणि ४ राखीव खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या संघात अशी काही नावं आहेत, जी सर्वांना आश्चर्यचकीत करणारी आहेत. तर काही खेळाडू असे देखील असे देखील आहेत ज्यांनी आयपीएल २०२४ स्पर्धेत चांगली कामगिरी केली, मात्र तरीही संघात स्थान मिळालेलं नाही.
टी -२० वर्ल्डकपसाठी निवडण्यात आलेल्या संघात युजवेंद्र चहलचं कमबॅक झालं आहे. तर संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांची पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळण्यासाठी निवड करण्यात आली आहे. संजू सॅमसन आणि रिषभ पंत यांचा यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघात स्थान न देण्यात आलेले खेळाडू
ऋतुराज गायकवाड..
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. तो आयपीएल २०२४ स्पर्धेत दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये त्याने ४४७ धावा केल्या आहेत. मात्र तरीही त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
साई सुदर्शन..
गुजरात टायटन्स संघाचा स्टार खेळाडू साई सुदर्शनने देखील लक्षवेधी कामगिरी केली आहे. तो आयपीएल २०२४ स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याच्या या स्पर्धेतील कामगिरी पाहिली, तर त्याने ९ सामन्यांमध्ये ४१८ धावा केल्या आहेत. असा रेकॉर्ड असूनही त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही.
केएल राहुल-
केएल राहुल हा भारतीय संघातील अनुभवी यष्टीरक्षकांपैकी एक आहे. सध्या तो लखनऊ सुपरजायंट्स संघाचं नेतृत्व करतोय. या हंगामात त्याने शानदार कामगिरी केली आहे. मात्र दुखापतीमुळे त्याला गेले काही महिने संघाबाहेर राहावं लागलं होतं. कदाचित याचा परिणाम संघनिवडीवर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
अभिषेक शर्मा..
सनरायझर्स हैदराबाद संघाकडून सलामीला येणाऱ्या अभिषेक शर्माने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने सलामीला फलंदाजीला येत ९ सामन्यांमध्ये ३०३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २१४.८९ इतका राहिला आहे. त्याला भारतीय संघाकडून खेळण्याचा अनुभव नाही. म्हणून त्याला संघात देण्यात आलेलं नाही.
हर्षल पटेल..
पंजाब किंग्ज संघातील मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलने गेल्या काही हंगामांमध्ये शानदार गोलंदाजी केली आहे. या हंगामातील ९ सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना त्याने १४ गडी बाद केले आहेत.यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेटही चांगला राहिला आहे. मात्र तरीदेखील त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल
राखीव खेळाडू
शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान