V 24 Taas
राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रविवारी (ता. २८) विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्ध्यासह चंद्रपूर जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. वाऱ्याचा जोर अधिक असल्याने अनेक झाडे उन्मळून पडली आहे.
यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं
याशिवाय काहींच्या घरांवरील पत्रे देखील उडून गेली आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगांव तालुक्यात रविवारी आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला.
सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. तसेच ७ घरांची पडझड देखील झाली. झाडे उन्मळून पडल्याने अनेक गावातील बत्ती गुल झाली होती. पिंपळगाव येथील १५ हेक्टर तीळ आणि आलेगाव येथे दोन हेक्टर केळी पिकाला अवकाळीचा मोठा फटका बसला.
अमरावतीला अवकाळीचा तडाखा
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड परिसराला देखील सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास पावसासह चक्रीवादळाचा तडाखा बसला. अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे येरड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या झिबला येथील दोन घरावरील टीनपत्रे उडून गेली.
खरबी मांडवगड येथील एका घरावरील टीनपत्रे उडाली. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संसार उघड्यावर पडल्याने शासनाने पंचनामे करून आम्हाला मदत करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वर्धा जिल्ह्यात तुफान पाऊस
अकोला, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी गारपीटीचा तडाखा देखील बसला आहे. वर्ध्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यात बोराच्या आकाराची गारपीट झाली. यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.
पुढील २४ तास विदर्भाला येलो अलर्ट
विदर्भातील ११ जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. बुलढाणा आणि अकोला वगळता उर्वरित जिल्ह्यांत अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडाटास ३०-४० प्रतितास सोसाट्याचा वारा येणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पावसाचा इशारा लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी,अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.