V 24 Taas
बुलडाणा जिल्ह्यातील एका गावात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १८ आरोपींना अटक केली आहे. दोन गटांत हाणामारी झाल्यामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. तर नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
बुलडाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. ग्राम सातगाव भुसारी येथे रात्रीच्या सुमारास तरुणांच्या दोन गटात किरकोळ वाद झाला होता. हा वाद शिगेला पोहोचला अन् त्यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत दोन तरुण जखमी झाले आहेत. रायपुर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांना घटनेची माहिती मिळाली.
त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बुलडाणा चिखली आणि धाड येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री दोन्ही गटातील १८ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चिखली तालुक्यातील सातगांव भुसारी या गावातील दोन गटात मागील काही दिवसांपासून कुणकुण सुरू होती. अशात काल रात्री (२७ एप्रिल) दोन्ही गट आसमोरासमोर आले. दोन्ही गटातील लोकांना एकमेकांना जबर मारहाण केली. त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं.
या घटनेची माहिती रायपूर पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिली. त्यांनतर त्यांनी दंगाकाबू पथक पाठविले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.पोलिसांनी या घटनेतील १८ आरोपीना अटक केली असून गुन्हे दाखल केल्याची माहिती मिळत आहे. किरकोळ कारणावरून २ गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात समोर आली आहे. यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता.