मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये तांत्रिक बिघाड; अमरावती, अकोला, वर्ध्यात मतदार ताटकळले

Share

V 24 Taas

महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, मतदानाला सुरुवात होताच काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला.

अमरावती, अकोला आणि वर्ध्यात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. ईव्हीएममध्ये बिघाड होताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अमरावती शहरातील रुक्मिणीनगर येथील शाळा क्रमांक १९ मधील खोली क्रमांक ५ मध्ये ईव्हीएम बंद पडलं.

जवळपास १५ मिनिटे वोटिंग मशीन बंद पडलं होतं. त्यामुळे मतदारांचा चांगलाच खोळंबा झाला होता. अखेर ईव्हीएममधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. सध्या अमरावतीमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. दुसरीकडे वर्ध्यात देखील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला.

सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरू झाल्यानंतर अचानक ईव्हीएम मशीन बंद पडलं. वोटिंग मशीन बंद पडताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. मतदान थांबल्याने मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. उमरा गावातील बुथ क्रमांक ३३३ मधील वोटिंग मशीन अचानक बंद पडलं. त्यामुळे साडेसात वाजेपर्यंत मतदानाला सुरुवात झालेली नव्हती. ईव्हीएम बदलण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते.

महाराष्ट्रातील ८ लोकसभा जागांसाठी आज मतदान

महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान पार पडत आहे. पहिल्या टप्पात विदर्भातील ५ जागांवर मतदान झालं होतं. यावेळी बऱ्याच नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती. दरम्यान, आज होणाऱ्या मतदानाला मतदार कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *