अमरावतीत हायव्होल्टेज ड्रामा; बच्चू कडू मैदानाच्या परवानगीवरून आक्रमक, पोलिसांशी बाचाबाची

Share

V 24 Taas

अमरावती

अमरावतीतील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ उद्या सायन्स कोर मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. हे मैदान बच्चू कडू यांनी आधीच बुक केले होते. असे असताना देखील याठिकाणी अमित शहा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे. या मैदनावर अमित शहा यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. ‘परवानगी आम्हाला मग सभा अमित शहा यांची कशी?’, असा सवाल करत बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. मैदानाच्या परवानगी प्रक्रियेवरून बच्चू कडू आणि पोलिस यांच्यामध्ये वाद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बच्चू कडू येणार म्हणून अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानाचे सर्व गेट पोलिसांनी बंद केले होते. मैदानावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी 24 तारखेसाठी बुक करून त्याचे पैसे ही भरले होते. पण याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. अमित शहा यांच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे.

परवानगी आम्हाला मग सभा अमित शहा यांची कशी असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. याच मैदानाची पाहणी करण्यासाठी बच्चू कडू स्वतः येत असल्याचे माहिती होताच पोलीसांनी सर्व गेट बंद केले. पोलिसांनी बच्चू कडू यांना गेटवरच थांबवले. अशामध्ये बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. ‘पोलिस भाजप कार्यकर्त्यांसारखे वागत आहेत असे म्हणत अमित शहांनी कायदा तोडायला सांगितला का?’, असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.

यावेळी बच्चू कडू यांनी कायद्यापेक्षा माणसं मोठी नाहीत, असे म्हणत परवानगी आम्हाला मिळाली असल्याचे सांगितले. मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी सायन्स कोर मैदानाच्या गेटवरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी पोलिसांनी बच्चू कडू यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण बच्चू कडू या मैदानाच्या परवानगीवर ठाम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *