V 24 Taas
संग्रामपूर:- मध्य प्रदेशातून संग्रामपूर तालुक्यात घातक हत्यारांची तस्करीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सुसंस्कृत भागाची प्रतिमा धूळीस मिळत आहे. या गोरखधंद्यातील मास्टरमाईंडला शोधून जेरबंद करण्यात पोलिसांना पुर्णपणे अपयश आल्याने संग्रामपुर तालुका हा अग्नी शस्त्रांच्या तस्करीचा केंद्रबिंदू बनला आहे. हि बाब आदिवासी बहुल तालुक्यासाठी चिंताजनक असून पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकारावर तात्काळ आळा घालने गरजेचे झाले आहे.
संग्रामपूर तालुक्यात २० नोव्हेंबर २०२१ पासून १८ एप्रिल २०२४ या अडीच वर्षांच्या कालावधीत विविध कारवायांमध्ये तब्बल ४२ देशी कट्टे, ३० मॅगझीन तसेच १९७ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. २० नोव्हेंबरला २०२१ ला झारखंड दहशतवाद विरोधी पथकाने संग्रामपूर तालुक्यातील ग्राम टूनकी येथे मध्यप्रदेशातील तीन आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्या कडून तब्बल १४ देशी पिस्तूल व १६० जिवंत काडतुसे जप्त केली. ९ डिसेंबर २०२१ ला स्थानिक गून्हेशाखेच्या पथकाने आदिवासी ग्राम जूनी वसाली येथील पूलावर मध्यप्रदेशातील दोन आरोपींकडून ३ देशी कट्टे व ६ जिवंत काडतुसे जप्त केली. १ फेब्रुवारी २०२३ ला स्थानिक गून्हेशाखेच्या पथकाने तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत टूनकी कडून शेगाव कडे जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला एकलारा फाट्याजवळ थांबवून चौकशी केली.
त्याच्या कमरेला पॅंटमध्ये खोसलेली देशी बनावटी पिस्टल तसेच ४ जिवंत काडतूसे जप्त केली. ३ जून २०२३ ला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या कारवाईत १४ देशी पिस्टल, २५ मॅगझीन, ८ जीवंत काडतुसे हस्तगत केले. २३ फेब्रुवारी २०२४ ला सोनाळा पोलिसांनी ग्राम टूनकी बु. येथील केदार नदीच्या पूलावर सापळा रचून हरियाणा राज्यातील नुहू जिल्ह्यातील सिंगार, पुन्हाना येथील एका आरोपीचे मूसक्या आवळल्या. या आरोपीकडून ६ देशी कट्टे, १ मॅक्झिन, १ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.
नूकतेच १८ एप्रिलला सापडा रचून सोनाळा पोलीसांनी मध्यप्रदेशातील ४ आरोपींकडून ४ पिस्तूल ४ मॅक्झिनसह १७ जिवंत काडतुसे जप्त केल्याने मध्यप्रदेशातून संग्रामपूर तालुक्यात घातक हत्यारांच्या तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. घातक हत्यारांची तस्करीतील मुख्य सूत्रधाराला जेरबंद करण्यात बूलढाणा जिल्हा पोलिस दलाला अपयश आल्याने परप्रांतीय गून्हेगारांना कायद्याची भीती उरली नाही. परीणामी सातपुड्याच्या पायथ्याशी मध्यप्रदेशातील तस्करांनी धुमाकूळ घालत असल्याने या भागाचे नाव धूळीस मिळत आहे. या गंभीर प्रकाराला तातडीने आळा घालून अवैध पिस्तूल माफीयांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांना रुद्रावतार घेण्याची गरज आहे.
अग्निशास्त्राच्या तस्करीतील चौघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
संग्रामपूर तालुक्यातील टूनकी ते वसाडी रोडवरील निमखेडी फाट्याजवळ वसाली शिवारात घातक हत्यारांची तस्करी करणाऱ्या मध्यप्रदेशातील ४ आरोपींना १८ एप्रिलला सापडा रचून सोनाळा पोलीसांनी जेरबंद केले होते. अटकेत असलेल्या ४ आरोपींना २२ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपींचा शोध घेण्यात पथके अपयशी
दोन महिन्यांपूर्वी २४ फेब्रुवारी २०२४ ला देशी कट्टे तस्करीत सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गून्हे शाखेचे पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आले होते. मात्र ते पथक आरोपींचा शोध घेण्यात अपयशी ठरले. पून्हा फरार आरोपीच्या शोधात विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून मोठी कारवाई अपेक्षित आहे.
स्थानिक गून्हे शाखेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
परप्रांतातून बूलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणारी घातक हत्यारे तसेच प्रतिबंधात्मक अमली पदार्थांची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. गुप्तचर यंत्रणा सुद्धा यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा विशेष शाखा, राज्य गुप्तचर विभाग, आयबी या यंत्रणांचे माहिती देवाणघेवीचे परस्परावलंबीत्व टाळून या भागात स्वतंत्र नेटवर्क उभारण्याची गरज आहे.
अग्निशास्त्राच्या तस्करीत युवा पिढी गूरफटली
ज्या वयात शैक्षणिक, वैचारिक, व्यावसायिक, सामाजिक कर्तृत्व दाखवून. आपली तसेच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणे अपेक्षित असते, त्या वयात युवापिढी अग्निशास्त्राच्या तस्करीत गूरफटली आहे. आता पर्यंत झालेल्या पोलिस कारवाईत २१ ते ३५ वर्षो वयोगटातील तरूणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला आहे. अगोदरच तरूण व्यसनाच्या विळख्यात सापडले असतांना आता तर थेट घातक हत्यारे तसेच अंमली पदार्थांच्या तस्करीत त्यांचा वाढता सहभाग चिंतेची बाब आहे.