V 24 Taas
नागपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये नवरदेवाने लग्नाआधी मतदानाचा हक्क बजावला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील बेला गावामध्ये नवरदेवाने ‘आधी मतदान, मग लग्न’अशी भूमिका घेतल्याचं दिसतंय. हा तरूण मतदान करून लग्नस्थळी रवाना झाला आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघातील बेला गावामध्ये लग्नाआधी नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ‘स्वप्नील डांगरे’ असं या नवरदेवाचं नाव आहे. स्वप्नीलचं आज लग्न आहे. त्याने आधी मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं. त्यानंतर तो लग्नासाठी लग्नस्थळी रवाना झाला आहे.
बेसिक शाळा या मतदान केंद्रावर मतदान करून नवरदेव लग्नासाठी नातेवाईकांसह रवाना झाला आहे. ही घटना रामटेक लोकसभा मतदारसंघात समोर आली आहे. नवरदेवाने लग्नाआधी मतदार केंद्रावर येऊन मत दिलेलं आहे. त्यानंतर वऱ्हाडी मंडळीसह नवरदेव लग्नमंडपाकडे रवाना झालाय.
आधी मतदान करेन आणि मगच लग्नाच्या बोहल्यावर चढेन, असा निश्चय बेला गावातील स्वप्निलने केला होता. तो सार्थ ठरवत आज मतदान करुनच तो विवाह मंडपाकडे रवाना झाला आहे. मतदान केंद्रात प्रवेश करताच पोलिसांसह कर्मचाऱ्यांच्या नजरा नवरदेवार खिळल्या होता. स्वप्निल लग्नाच्या कपड्यांमध्येच मतदान केंद्रावर गेला होता.
नागपूरमध्ये महायुतीकडून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यात लढत सुरू होत आहे. त्यामुळे आता गडकरी नागपुरमध्ये हॅट्रिक मारणार की विकास ठाकरे नागपूरचा विकासरथ आपल्या हाती घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.