V 24 Taas
मजुरीचे पैसे देण्यास नकार दिल्याने पती आणि सासऱ्याने महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना चांदसे (ता. शिरपूर) येथे घडली. या प्रकरणी दोन्ही संशयितांना अटक करून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.चांदसे येथील भारती गजेंद्र भिल (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत भारतीचे माहेर नेर (ता. धुळे) येथील आहे. भारतीचा विवाह सुमारे १५ वर्षांपूर्वी चांदसे येथील गजेंद्र भिल याच्याशी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्यासोबत सासरा विजय भिल देखील राहत होता. गजेंद्रला मद्यपानाचे व्यसन असल्यामुळे तो पैशांची मागणी करून भारतीला नेहमी त्रास देत होता. सहा महिन्यांपूर्वी गजेंद्र आणि भारती मजुरीसाठी गुजरातमध्ये गेले. महिनाभरापूर्वी ते परत आले. भारतीने आईला फोन करून गुजरात येथे मिळालेल्या मजुरीच्या पैशांची मागणी करून पती व सासरा छळ करीत असून, ठार मारण्याची धमकी देत असल्याचे सांगितले.
दरम्यान ५ एप्रिलला दुपारी नीला मालचे यांचा पुतण्या येळू याने त्यांना फोन करून चांदसे येथे भारतीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यांनी भारतीचा मुलगा अनिकेत याला फोन करून विचारले असता, त्याने वडील आणि आजोबा यांनी आईला मारले असून, तिला शिरपूरला आणल्याची माहिती दिली. चांदसे येथील सरपंच विजय भिल यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र मृतदेहाची परिस्थिती संशयास्पद असल्यामुळे याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली. दरम्यान रात्री पावणेअकराला संशयित पती गजेंद्र भिल व सासारा विजय मोतिसिंह भिल यांना अटक करण्यात आली. भरतीची आई नीला मालचे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.