दूषित पाणी पिल्याने २ महिलांचा मृत्यू; कुटुंबीयांसह ग्रामस्थांचा आरोप

Share

V 24 Taas

अकोल्यात गेल्या महिन्याभरात दोन महिलांचा मृत्यू झालाय. हा मृत्यू दूषित पाणी पिल्याने झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. अकोल्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी खुर्द गावात स्वतंत्र विहिरीचे दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे दोन महिलांचा मृत्यू झालाय, असा आरोप मृतांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी देखील केलाय. या प्रकारामुळे बार्शिटाकळी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, निंबी खुर्दवासीयांच्या या आरोपानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झालीय. आता या गावातल्या स्वतंत्र विहिरीतल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे आरोग्य जिल्हाधिकारी बळीराम गाढवे यांनी साम टिव्हीशी बोलतांना म्हटलंय. दरम्यान गावात सध्या एकही रुग्ण किंवा साथ नाहीये, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

या निंबी खुर्द गावातल्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार, आरोग्य विभागाच्या पथकानं काल शनिवारी स्वतंत्र विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोन महिलांचा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाला की नाहीये, हे स्पष्ट होणार आहे. आरोग्य विभागानं गावात भेट दिली असता गावात सध्या एकही रुग्ण किंवा साथ नाहीये. तरीही उद्या या ठिकाणी आम्ही सुद्धा भेटी देणार आहो. असेही बळीराम गाढवे यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, निंबी खुर्द येथील 19 वर्षीय कुमारी प्रतीक्षा किशोर शिवणकार हिला मळमळ, उलट्या अशा समस्या सुरू होत्या. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दरम्यान प्रतिक्षाची प्रकृती अचानक खालावली आणि तिचा मृत्यू झालाय. तर सरस्वताबाई जनार्दन गावंडे यांचे पोट दुखत होते. त्यांनाही उलट्या आणि मळमळ होऊ लागल्यानं एका खाजगी दवाखान्यात उपचारार्थ नेले होते. परंतु त्यांचाही मृत्यू झाला.

या गावात सरकारी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नाहीये. सध्या गावकरी स्वतंत्र विहिरीचे पाणी पित आहेत. या विहिरीचे पाणी पीत असताना गेल्या चार ते पाच महिन्यापासून या पाण्यामुळे अनेकांना आजार होत असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.

आता दोन दिवसांच्या सुट्या आल्यामुळे सदर पाण्याचा अहवाल अद्यापपर्यंत प्राप्त झाला नाहीये. त्यामुळे पाणी दूषित आहे किंवा नाही? याबाबत काही सांगता येणार नाहीये. असे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पाणी तपासणीचा अहवाल आल्यानंतरच सर्व बाबी निष्पन्न होणार, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *