V 24 Taas
मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणीसह यवतमाळ जिल्ह्याला काल सकाळी बसलेल्या भूकंपाच्या हादऱ्याने अनेक ठिकाणी घरांना तडे गेले आहेत. हिंगोलीच्या सावरखेडा गावामध्ये दहापेक्षा अधिक घराच्या भिंती आणि मुख्य खांबांना भेगा पडल्यात. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. आज सकाळी महसूल प्रशासनाने या गावात जाऊन घरांच्या नुकसानीची पाहणी करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
हिंगोलीतील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र
२१ मार्च रोजी सकाळी ६:३० वाजता ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे समजले आहे. झालेल्या भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे.
मराठवाड्यातील १९९३ च्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा भूकंप आहे. यावेळेस हिंगोली, नांदेड आणि परभणी या मराठवाड्याती जिल्ह्यासह लगतच्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेड तालुक्यातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसले.
घराची भींत कोसळली
काल परभणी जिल्ह्यात देखील भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे एका घराची भिंत कोसळली आहे. भींतीत बांधलेल्या अलमारीमधील भांडी देखील खाली कोसळलीत. पहिला भूकंपाचा झटका जाणवताच घरातील सर्वच व्यक्ती बाहेर पळाल्या. त्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही.