‘विरोधकांना उत्तर देताना…’; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जबाबदार पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र दिला?

Share

V 24 Taas न्युज नेटवर्कर

आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी , बैठकांचा धडाका लावला आहे. राज्यातील पक्षफुटीच्या राजकारणामुळे राजकीय समीकरण संपूर्ण बदललं आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्षांचा कस लागणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रसिद्धीची जबाबदारी असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विशेष कानमंत्र दिला आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जय्यत तयारी केली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देशभरात जाहीर सभांचा धडाका लावला आहे. तर विरोधी पक्षांनीही सभांचा धडाका लावला आहे. आगामी निवडणुकीमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. मात्र, याचदरम्यान, भाजपने पक्षातील लोकसभा निवडणूक प्रसिद्धी यंत्रणेला विशेष सल्ला दिला आहे.

भाजपने प्रसिद्धीची जबाबदारी असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना सांगितलं आहे की, ‘तुम्हाला उलटसुलट प्रश्नांचा मारा केला जाईल, त्याचं उत्तर देताना सावधगिरी बाळगा. घाईघाईने उत्तरे देताना नवा वाद किंवा वादंग निर्माण करू नका’.

तसेच भाजपच्या लोकसभा प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समितीने प्रसिद्धीची जबाबदारी असलेल्या पदाधिकारी , कार्यकर्त्यांना म्हटलं की, ‘तुम्ही चर्चेत बोलताना मांडणार असलेल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ कागदपत्रे सोबत न्यावी. तुमची बोलताना देहबोली आत्मविश्वासपूर्ण असायला हवी. कोणी आपल्या पक्षाच्या विरोधात बोलत असताना तुम्ही कोणत्याही प्रकारचे संतप्त भाव, नकारात्मक भाव चेहऱ्यावर येऊ देता कामा नये’.

‘पक्षाच्या धोरणाविरोधात , भुमिकेविरोधात एकही शब्द तोंडून निघणार नाही याकडे लक्ष द्या. ‘ऑफ द रेकॉर्ड’ बोलणे टाळा. मुद्द्याचे बोला. अडचणीचा प्रश्न आला तरी न चिडता संयमाने उत्तर द्या, असा कानमंत्र देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *