V 24 Taas
वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेला २०२३ मध्ये सुरुवात झाली. या स्पर्धेतील दुसऱ्याच हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ फायनलमध्ये दाखल झाला आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला लीग क्रिकेट इतिहासातील सर्वात अनलकी संघ म्हटलं जातं. कारण स्टार खेळाडूंनी सुसज्ज असलेल्या या संघाला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. मात्र आज (१७ मार्च) होणाऱ्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ट्रॉफी जिंकून इतिहास रचण्याची संधी असणार आहे.
वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी केविन पीटरसन , राहुल द्रविड आणि विराट कोहलीसह क्रिकेट विश्वातील ७ दिग्गज खेळाडूंनी कर्णधाराची भूमिका पार पाडली आहे. आता स्म्रिती मंधाना हे स्वप्न पूर्ण करू शकते.
वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं हे दुसरं हंगाम आहे. पहिल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ८ पैकी केवळ २ सामने जिंकता आले होते. तर या हंगामात ८ पैकी ४ सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. त्यानंतर एलिमिनेटरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला फायनलमध्ये पोहचवण्यात एलिस पेरीचा मोलाचा वाटा आहे. तिने या संघाकडून खेळताना ८ सामन्यांमध्ये ३१२ धावा केल्या आहेत. ती या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे. तर कर्णधार स्मृती मंधानाने २६९ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर,आशा शोभनाने १० गडी बाद केले आहेत.