V 24 Taas
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचं साखळी उपोषण अद्यापही सुरु आहे. मात्र राजकीय नेत्यांना धडा शिकवण्यासाठी मराठा बांधवांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं.आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मराठा उमेदवार देण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला होता. त्यानुसार माढा लोकसभा मदतदारसंघातसाठी मराठा समाजाच्या चार उमेदवारांची घोषणा आज झाली आहे.मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानुसार, माढा लोकसभेसाठी पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातील चार उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ही मागणी मान्य करण्यासाठी जरांगे यांनी आता निवडणुकीच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.त्यासाठी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे मराठा समाज बांधवांना आवाहन केले आहे. त्यानुसार पळशी येथील मराठा समाज बांधवांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार धनंजय कलागते, संतोष झांबरे, विठ्ठल काटवटे आणि सचिन पवार यांची माढ्यातून उमेदवारी जाहीर केली आहे.
मनोज जरांगेची एसआयटी चौकशी रद्द करा
मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आंदोलनावर लावण्यात आलेली विशेष चौकशी समिती अर्थात एसआयटी (SIT) रद्द करा, अशी मागणी राज्यभरात होऊ लागली आहे. एसआयटी चौकशीच्या आदेशाबाबत मराठा समाजाने निषेध नोंदवला आहे. ही चौकशी मागे घेण्यात यावी, अन्यथा समाजात असंतोष पसरून समाज उग्र आंदोलन करेल असा इशारा अर्धापूर येथील सकल मराठा समाजाने दिला आहे.