V 24 Taas
राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू आहे. सर्वच पक्षांकडून विविध मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाचा दावा केला जात आहे. भाजपने देखील लोकसभेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघाचे नाव नाही. मात्र या यादीनंतर पुन्हा एकदा खासदार नवणीत राणा यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणे निश्चित आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळालीये. नवनीत राणा कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढल्यास आमदार रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष खासदार नवनीत राणा यांना निवडणुकीत पाठिंबा देणार, अशी चर्चा सुरू आहे.
कालच आमदार रवी राणांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर या चर्चेला आणखी उधाण आलं आहे. 2014 मध्ये नवनीत राणा राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणुकीत उभ्या असताना तेव्हाही आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता.
अमरावती लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील महायुतीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे नवणीत राणा यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरच महायुतीचा पाठिंबा मिळेल अशी चिन्हे आहेत. त्यावर आता नवणीत राणा काय निर्णय घेणार याकडे अमरावतीकरांचं लक्ष लागलं आहे.