V 24 taas
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. येत्या १ जूनपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये केले जाणार आहे. दरम्यान या स्पर्धेत आयसीसी नवा नियम लागू करण्याच्या विचारात आहे. कोणता आहेत तो नियम? जाणून घ्या.आयसीसीने डिसेंबर २०२३ मध्ये स्टॉप क्लॉक नियमाची घोषणा केली होती. या नियमानुसार, गोलंदाजांवर काही बंधनं घालण्यात आली होती. आयसीसीने हा नियम आधी ट्रायल बेसिस म्हणून लागू केला होता. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार हा नियम आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत कायम स्वरुपासाठी लागू केला जाणार आहे.
काय म्हणतो नियम?
क्रिकेटमध्ये फलंदाजांवर वेळेचं बंधन असतं. फलंदाज बाद झाल्यानंतर निर्धारीत वेळेत पुढील फलंदाज मैदानावर येणं गरजेचं असतं अन्यथा फलंदाजाला बाद घोषित केलं जातं. मात्र आता गोलंदाजांवरही असंच काहीसं बंधन असणार आहे. या नव्या नियमानुसार षटक संपल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला पुढील षटक सुरु करण्यासाठी ६० सेकंदांचा अवधी दिला जाणार आहे.
षटक संपल्यानंतर अंपायर स्टॉप वॉच सुरु करतात आणि ६० सेंकदांचा टाईमर सेट करतात. जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने पुढील ६० सेकंदात षटक सुरु केलं नाही. तर अंपायरकडून पेनल्टी दिली जाते. पहिल्यांदा हा नियम मोडल्यास अंपायरकडून वॉर्निंग दिली जाते. मात्र त्यानंतर जर या नियमांचं उल्लंघन केलं गेलं तर संघाला पेनल्टी दिली जाईल.
आयसीसीकडून हिरवं कंदील..
हा नियम डिसेंबर २०२३ मध्ये ट्रायल बेसिसवर लागु करण्यात आला होता. आयसीसीच्या कमिटीला हा नियम फायदेशीर असल्याचं जाणवलं आहे. त्यामुळे आयसीसीने हा नियम कायमस्वरुपी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार सध्या दुबईत आयसीसीची बैठक सुरु आहे. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.